मुंबई : हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळवण्यासाठी काही मुस्लिम महिलांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
शनी शिंगणापूर येथील मूर्तीच्या चौथऱ्यावरील महिलांच्या प्रवेशाचा वाद ताजा असतानाच हाजी अली दर्ग्यातही महिलांना करण्यात आलेली प्रवेश बंदी मागे घेण्यात यावी यासाठी मुस्लिम महिलाही रिंगणात उतरल्या आहेत.
हाजी अली दर्ग्यातील काही भागांत महिलांना आजही प्रवेशास बंदी आहे. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट एजाझ अब्बास नक्वी यांच्यातर्फे एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
यावर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय शबरीमला येथील मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत काय म्हणते ते पाहून आपला निकाल देऊ, असं म्हटलंय.
महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडने आंदोलन केले होते. हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. केरळ येथील शबरीमाला मंदिराचा वादही आता सर्वोच्च न्यायालयात आहे.
महिलांना देऊळ अथवा मशिदीत सर्वत्र प्रवेश असावा; तसेच त्या ट्रस्टी म्हणूनही निवडल्या जाव्या यासाठी यासाठीही अब्बास आग्रही आहेत. आता उच्च न्यायालय काय निर्णय देते, याची ते वाट पाहात आहेत.