नागपूर : मराठा मोर्च्यांना आंबेडकर विचारवंतांनी आपला पाठिंबा दिला आहे. मराठा विरोधात प्रति मोर्चा काढू नका, असे आवाहन आंबेडकर विचारवंतांनी दलित जनतेला केले आहे.
मराठा आरक्षण असेल, किंवा कोपर्डी प्रकरण अशा अनेक मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजातर्फे मूक मोर्चे काढण्यात येत आहेत. हक्काचे आरक्षण व न्याय मागणे हा प्रत्येक समाजाचा अधिकार असल्याने आंबेडकर विचारवंतांनी मराठा मोर्च्यानां पाठिंबा दिला आहे.
या समर्थक व पुरस्कर्त्यांमध्ये आंबेडकरी जनता, डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक कर्त्याकर्ते व महिला संघटनांचा समावेश आहे. हा पाठिंबा दर्शवत असताना मराठा समाजाच्या विरोधात प्रति मोर्चे काढू नका, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भाऊसाहेब लोखंडे, मिलिंद पखाले, वकील अश्विनी मून यांनी केले आहे.
काही लोक समाजात तेड निर्माण करण्याच्या प्रयत्न करतात ते थांबविण्यासाठी हे आवाहन करत असल्याचे ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत भाऊसाहेब लोखंडे यांनी नागपूरला पत्रकार परिषद सांगितले, कोपर्डी प्रकरणांत पीडित मुलगी बहुजन समाजाची असल्याने त्यात अट्रोसिटी लावण्याचा संबंध येत नाही. या निर्णयाला नागपूरच्या विविध क्षेत्रातील आंबेडकर विचारवंतांनी पाठिंबा दिला आहे.