गणपतीपुळे : गणपतीपुळ्यातील येणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी... गणपतीपुळ्यात राहण्यासाठी येणाऱ्या भक्तगणांची लूट आता थांबणार आहे. कारण आता गणपतीपुळ्यात येणाऱ्या पर्यटकांना चक्क २० रुपयांपासून ते ३०० रुपये मोजून आलिशान भक्तनिवासमध्ये राहता येणार आहे. ७३ खोल्यांचे आलिशान भक्तनिवासात ही सोय येत्या गुरुवार पासून उपलब्ध होणार आहे.
गणपतीपुळे म्हणजे देशीविदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय... इथल्या समुद्राचा आस्वाद आणि गणरायाचा आर्शिवाद घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक इथं येतात. मात्र इथं येणाऱ्या पर्यटकांना गणपतीपुळेत राहण्यासाठी दिवसाला किमान बाराशे रुपयापासून ते तीन हजार रुपये मोजावे लागतात.
आता पर्यटकांची ही आर्थीक पिळवणूक थांबणार आहे. कारण, गणेशभक्तांसाठी इथं हे आलीशान भक्त निवास बांधण्यात आलंय. जिथं पर्यटकांना चक्क २० रुपयांपासून ते ३०० रुपये मोजून रहाता येणार आहे. ७३ खोल्या आणि एकावेळी एक हजारहून जास्त लोक राहू शकतील असं ११ कोटींचं आलीशान भक्तनिवास मंदिर समितीनं खुलं केलंय.
उद्या (गुरुवारी) या भक्तनिवासाचं उद्घाटन होणार आहे. गणपतीपुळ्यात येणाऱ्या शाळेतल्या मुलांना इथं राहण्यासाठी विशेष सवलत मिळणार आहे. थोड्याच दिवसात आँनलाईन पद्धतीने या भक्तनिवासाचे बुकिंगदेखील सुरु होईल, अशी माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी दिलीय.
पर्यटन केंद्रावर गेल्यानंतर महागडी हाँटेल आणि इथं येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला लागणाऱ्या कात्रीमुळे पर्यटक चांगलाच मेटाकुटीला येतो. एकीकडे महागाई वाढत असताना गणपतीपुळे देवस्थानने पर्यटक आणि गणेशभक्तांसाठी ही अनोखी भेट देऊ केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.