पिंपरी-चिंचवड : मुंबई पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे. गेली 15 वर्षे शहरावर सत्ता असलेल्या अजित पवारांना मोठं आव्हान निर्माण झालंय. त्यामुळे अजित पवार आपला गड राखतात की भाजप त्यांच्याकडून मनपा खेचून आणते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
पिंपरी चिंचवड, बारामतीनंतर राष्ट्रवादीचा पर्यायाने अजित पवारांचा अभेद्य बालेकिल्ला. गेली 15 वर्ष अजित पवारांची शहरावर हुकूमत. त्यातील 10 वर्ष तर निर्विवाद सत्ता, मुंबई जसं शिवसेनेचे नाक तसं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचं नाक...हे नाक भाजप कापणार की अजित पवार सगळयांना पुरून उरणार हे येत्या महापालिका निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
आतापर्यंत शहरात अजित पवारांचा शब्द प्रमाण मानला जायचा. पण लोकसभा विधानसभा निवडणुकांपासून अजित पवारांच्याच साथीदारांना फोडत भाजपने शहरात अजित पवार यांना मोठं आव्हान निर्माण केलं आहे. लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे हे भाजपचे प्रमुख नेते असणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सत्ता कबिज करणे हेच आपलं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यातून दाखवून दिलं आहे. एवढे नेते आयात करूनही जर पराभव झाला तर तो मुख्यमंत्र्यांना धक्का देणारा असणार आहे.
दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि मनसे या तिन्ही पक्षांनी म्हणावा तसा प्रभाव पाडलेला नाही, त्यामुळं हे पक्ष गेल्या निवडणुकीत केलेली कामगिरी तरी टिकवता याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. एकूणच काय तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.