उस्मानाबाद : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागलं. आळणी इथं ही घटना घडलीय.
आळणी गावात वाळून गेलेल्या द्राक्षबागेची केंद्रीय पथक पाहणी करत असताना, संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून धक्काबुक्की केली. संतप्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पथकानं हुज्जत घातली त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे या ठिकाणी काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. संतप्त शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत, पथकानं मग शेतकऱ्यांशी १५ मिनिटं चर्चा केली.
पथकाचा शेतकऱ्यांना अनाहूत सल्ला...
तर दुसरीकडे, धुळे जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय समितीने, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळण्याचंच काम केलं. 'कुठल्याही परिस्थितीत कर्ज माफी मागू नका... वास्तवात जगायला शिका' असा अनाहूत सल्ला केंद्रीय समितीनं शेतकऱ्यांना दिलाय.
तीन सदस्यांचं पथक धुळे जिल्ह्यात नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीरा आलं. यावेळी जिल्हा प्रशासनानं समितीला खरीपातील कोरडवाहू आणि बागायत कापसाची दुरवस्था दाखवली. सोबतच कोरड्याठाक विहिरीही दाखवल्या. यावर समिती सदस्यांनी ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचं मान्य केलं.
मात्र, आपल्या हातात अहवाल पाठवण्या पलिकडे काही नसून, सरकारी नियमांमुळे हा दौरा करावा लागत असल्याची धक्कादायक कबुलीही समितीचे सदस्य रेड्डी यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.