धक्कादायक, रूट कनॉल करताना ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

दाताचं रूट कनॉल जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीय. रूट कनॉल करताना एका ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय.

Updated: Jul 3, 2015, 05:09 PM IST
धक्कादायक, रूट कनॉल करताना ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू title=

पुणे : दाताचं रूट कनॉल जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीय. रूट कनॉल करताना एका ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय.

सानवी निरंजन रेवतकर असे या मुलीचे नाव आहे. ३ वर्ष २ महिन्यांची सानवी आज आपल्यात नाहीये. अगदी अचानकपणे ती हे जग सोडून गेलीय. तिचे आई वडील या धक्क्यातून सावरणं अवघड आहे. दातांमध्ये रूट कनॉल करण्याचं निमित्त झालं आणि तिचा जीव गेला. दातांवरील उपचारांसाठी तिचे वडील तिला डॉ अंकुर कुलकर्णींच्या क्लिनिक मध्ये घेऊन गेले होते. रूट कनॉल करताना दातांमध्ये भूल देण्यात आली होती. याच दरम्यान तिची शुद्ध हरपली आणि पुढील काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. सानवीच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप सावनीचे वडील निरंजन रेवतकर यांनी केला आहे.  

डॉक्टर अंकुर कुलकर्णी यांनी हा आरोप फेटाळला आहे. जी प्रक्रिया प्रत्येक रुग्णासाठी केली जाते तीच प्रक्रिया सानवी साठी केली गेली. त्यात कुठलीही चूक झाली नसून लाखात एखाद्या रुग्णाच्या बाबतीत अशा प्रकारची मेडिकल इमर्जन्सी शक्य असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय.

सानवीचे आई वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. सानवी ही त्यांची एकुलती मुलगी होती. तिच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.