ठाणे : नववर्ष स्वागत किंवा निसर्ग सहल म्हटली की सर्रास आठवतं ते महाबळेश्वर आणि गोवा. मात्र आता मुंबईपासून अगदी जवळच एक असं पर्यटन केंद्र तयार झालेय, तिथे तुम्ही निसर्गाचा मनमुराद अनुभव घेऊ शकता. मग चला ठाण्यातल्या शहापूरमध्ये.
निसर्गरम्य ठिकाण, गर्द झाडी, दुथडी भरुन वाहणारी नदी... निसर्गाचा जीवंत अनुभव देणारं हे वातावरण ठाण्यातल्या शहापूर मध्येच उपलब्ध आहे. याखेरीज नदीत स्पिड बोटीचा थरार, झाडापेडांच्या संगतीत निवास आणि भटकंती, हे सारंही तुम्हाला इथेच अनुभवायला मिळतंय. मुंबईपासून अवघ्या ८० किलोमीटर आणि ठाण्यापासून ५० किलोमीटर दूरवर या पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात आलीय.
इथून १८ किलोमीटर लांब असलेल्या भागदळ गावातल्या ग्रामस्थांनी त्यांच्या गावात वनक्षेत्र वाढवलंय. सुमारे १४ एकर क्षेत्रात नैसर्गिक साधनसंपत्तीची कोणतीही हानी न करता हे पर्यटन स्थळ विकसित करण्यात आलंय. वन विभागानं स्थानिकांनाच हे पर्यटन केंद्र चालवायला दिल्यामुळे, अस्सल ग्रामीण ढंगाच्या खाण्याच्या लज्जतीचा आस्वादही ओघानं आलाच. खेरीज लहानग्यांसाठी इथे चिल्ड्रन पार्क आहे ते वेगळंच. त्यामुळे शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी इथे पर्यटकांचा चांगलाच राबता असतो.
या प्रकल्पामुळे स्थानिक आदिवासींना रोजगाराचं सक्षम साधनच उपलब्ध झालंय. मुंबईपासून अगदीच जवळ निसर्गाचा मुक्त आनंद देणारं असंच हे शहापूर पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे आवर्जुन या ठिकाणाला तुम्हीही भेट देऊ शकता.