बीड : माहेरकडील संतप्त मंडळींनी मयत विवाहितेवर तिच्या पतीच्या दारासमोरच अंत्यसंस्कार केले. ही घटना वराई तालुक्यातील सिरसदेवी येथे घडली. विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती.
ठाकरआडगाव तालुका गेवराई येथील बंडू शेषेराव गाडे यांची मुलगी छाया हिचा विवाह ४ वर्षांपूर्वी लक्ष्मण कदम याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही वर्षे सुखाची गेली, परंतु नंतर हुंड्यातील राहिलेले २५ हजार रुपये आणि १ तोळ्याची अंगठी घेऊन ये, या कारणावरुन तिचा छळ सुरु झाला.
या छळाला कंटाळून २५ वर्षीय छायाने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता राहत्या विषारी द्रव प्राशन केले.तिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी माहेरकडील मंडळींनी तिने आत्महत्या केली नाही, तर हत्या झाल्याचा आरोप केला. माहेरकडील मंडळीने सासरच्यांना जिल्हा रुग्णालयातच चोप दिला.
छायाला ३ वर्षाची श्रद्धा मुलगी आहे, तिचे वडिल लक्ष्मण हे शेती आणि मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय करतात, पण आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वडिल लक्ष्मण तुरूंगात असल्याने ही मुलगी सध्या तरी पोरकी झाल्यासारखी आहे.
दरम्यान, माहेरकडील मंडळी संतप्त होती. अंत्यसंस्कार गावातील स्मशानभूमीत न करता सासरकडील दारातच करण्याच्या निर्णयावर ते ठाम होते. पोलिसांच्या उपस्थितीत छायावर मोहरकडील नातेवाईकांनी रात्री उशिरा तिच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले.