विकास भदाणे, जळगाव : राज्यात सध्या उष्णेतीची लाट आलीये.. जळगावातही पारा ४५ ते ४६ वर पोहोचलाय. अंगाची लाही लाही करणा-या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात बर्फाचा भाव वधारलाय.. मात्र हा बर्फ कोणत्या दर्जाचा असतो ते खाण्यापर्वी दोनदा विचार करा...
जळगाव MIDC मधल्या बर्फाच्या कारखान्यात पत्र्याच्या चौकोनी बॉक्समध्ये बोअरिंग, विहीर किंवा अन्य स्रोतातून मिळणारे पाणी टाकलं जातं. नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून बर्फ तयार होतो. त्यांनतर हा बॉक्समधून बर्फ कसा काढतात, ते पाहिलं तर किळस वाटेल... बर्फाचा कारखाना ते विक्रेता असा या लादीचा प्रवास तर आणखीनंच घाणेरडा, किळसवाणा असतो. मग, असा बर्फ खाऊन तुम्ही निरोगी कसे रहाल.
बोअरिंगच्या, विहिरीच्या पाण्याने किडनी स्टोन होण्याची दाट शक्यता असते. शिवाय डायरिया, गॅस्ट्रोसारखे आजार होतात. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने आरोग्याला अपायकारक बर्फ निर्मितीच्या कारखान्यांवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. मात्र, विभागाकडून याकडे कानाडोळा होताना दिसतो.
बऱ्याचदा जाणीव असूनही लोक आरोग्याकडे दूर्लक्ष करताना दिसतात. त्यातलीच गत अशा अशुद्ध पाण्यापासून बनविल्या जाणाऱ्या बर्फाच्या बाबतीत आहे. थंडपेयांचा स्वाद घेताना त्यासाठी वापरला जाणारा बर्फ कुठला, हे तपासणे गरजेचे आहे.