नाशिक : 'दिव्य मराठी' या वर्तमानपत्रामध्ये सांस्कृतिक आणि सिने पत्रकार प्रियंका डहाळे हिचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. ती केवळ २६ वर्षांची होती.
मुंबईहून नाशिकला जात असताना नाशिकमधल्या पाथर्डी फाट्यावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. प्रियंका प्रवास करत असलेल्या कूल कॅब आणि एका ट्रकची धडक झाली.
समोर असलेल्या वाळूनं भरलेल्या ट्रकची मागच्या बाजुची झडप अचानक उघडली गेली. त्यामुळे, मागे असलेल्या टॅक्सीच्या काचेवर रात्रीच्या अंधारात अचानक वाळू पडली. वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला.... आणि टॅक्सी समोरच्या ट्रकमध्ये जाऊन घुसली.
या अपघातात कूल कॅबचा चेंदामेंदा झालाय. या अपघातात प्रियंकासह तीन जण ठार झालेत. अपघातानंतर जखमींना तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं पण, उपचारादरम्यान प्रियंकाचा मृत्यू झाला.
या बातमीमुळे लग्नघर म्हणून सजल्या जाणाऱ्या त्यांच्या घरावर शोककळा पसरलीय. नियतीचा क्रूर खेळ म्हणजे, १४ मे रोजी प्रियंका हिचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. मात्र, आपल्या साखरपुड्यासाठी निघालेल्या प्रियंकाचे स्वप्न या अपघातात एका क्षणातच संपुष्टात आले.
प्रियंका ही एक उत्तम कवयित्रीदेखील होती. 'अनावृत रेषा' हा तिचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. नवोदितांच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा 'विशाखा काव्य पुरस्कार' प्रियंका हिला मिळाला होता. प्रियंका हिनं पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून मास कम्युनिकेशनची पदवी घेतली होती. केवळ २६ वर्षांच्या प्रियंकानं अल्पावधीतच पत्रकारितेत आपला ठसा उमटवला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.