औरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड!

औरंगाबाद  जिल्हा परिषद निवडणूकांत युतीवरून चांगलाच वाद पेटलाय. खासदार चंद्रकांत खैरे तर भाजपलाच प्रतिस्पर्धी म्हणत आहेत. तर मंत्री खोतकर थेट भाजपला भुईसपाट करण्याची भाषा बोलताना दिसतायत. ही विखारी भाषा आता भाजपला चांगलीच झोंबलीय... त्यामुळं आता युतीवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहे.

Updated: Jan 18, 2017, 08:03 PM IST
औरंगाबादमध्ये 'युती'ची चर्चेआधीच चिरफाड! title=

विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबाद  जिल्हा परिषद निवडणूकांत युतीवरून चांगलाच वाद पेटलाय. खासदार चंद्रकांत खैरे तर भाजपलाच प्रतिस्पर्धी म्हणत आहेत. तर मंत्री खोतकर थेट भाजपला भुईसपाट करण्याची भाषा बोलताना दिसतायत. ही विखारी भाषा आता भाजपला चांगलीच झोंबलीय... त्यामुळं आता युतीवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहे.

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंची ही भाषा, युती तोडण्याच्या दिशेनं घेतलेली झेप आहे की काय? असा प्रश्न पडतो... कारण एकीकडे या दोन्ही पक्षांच्या युतीसाठी बैठकांवर बैठका सुरु आहेत तर दुसरीकडे शिवसेना मेळाव्यात शिवसेनेनं भाजपलाच टार्गेट केलं. युती झाली नाही तर भाजप भुईसपाट होईल, असं वक्तव्य राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एका सभेत नुकतंच केलं.  

शिवसेना नेत्यांच्या या भाषेनंतर आता भाजपाही आक्रमक झालंय. खैरेंना किंमत देण्याची गरज नाही तर खोतकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार अतुल सावेंनी केलीय.

तर आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणणे म्हणजे शिवसेना आता भाजपला घाबरत असल्याचं चिन्हं आहे, असं भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी म्हटलंय. 

युती होण्याआधीच शाब्दिक फटाके मात्र जोरात फुटायला लागलेत. दोन्ही पक्षांची भाषा पाहता युती होणारच नाही असं चित्र आहे. त्यामुळं दोन्ही पक्ष खाजगीत कामालाही लागलेच. त्यामुळे आता सेना-भाजपमध्ये काय चित्र दिसतं ते काही दिवसातच कळेल.