पुणे / रत्नागिरी : म्हैसाळ गर्भलिंग प्रकरणानंतर आता पुण्यातल्या दौंडमध्येही असाच प्रकार सुरू असल्याचं उघड झालंय... याप्रकरणी संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आलीय.
सांगलीतलं म्हैसाळ गर्भलिंग प्रकरण ताजं असताना पुण्यातल्या दौंडमध्येही गर्भलिंग निदान होत असल्याचं उघड झालंय. दौंड, बारामती, इंदापूर, फलटण परिसरात गेली दीड वर्षे डॉक्टर मधूकर शिंदे गर्भलिंग निदान चाचणी करत होता. दौंड पोलिसांनी बिरोबावाडीमध्ये छापा टाकून डॉक्टर शिंदेसह हेमंत आटोळे, संतोष ओतारी, सोमनाथ होले या तिघांनाही गजाआड केलंय.
आरोपी सोमनाथ होलेच्या घरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र सुरू असल्याचं या छाप्यात आढळलं. गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा आणि 59 हजार रुपये पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस सहाय्यक निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि तपास अधिकारी डॉ. रुपाली पाखरे यांनी दिलीय.
डॉ. मधुकर शिंदे रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात 28 ऑगस्ट 2012 पासून स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून काम करत होता. मात्र केवळ कागदोपत्री... तेव्हापासून नोटीस मिळाल्यानंतर केवळ एक दिवसच कामावर हजर रहायचं आणि इतर दिवशी दांड्या मारायचा असा त्याचा प्रकार सुरू होता.
डॉक्टर मधुकर शिंदेची कारकीर्दच वादग्रस्त आहे. यापूर्वी देखील ठाण्यात त्याची काही प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणीही जिल्हा शल्य चिकित्सकांनी आरोग्य विभागाकडे यापूर्वीच केलीय. आता डॉ. शिंदेसह तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.