डोंबिवली : क्षुल्लक वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराने डोंबिवली शहर हादरले. ठाकुर्लीच्या चोळे गावातील बालाजी नगर परिसरात आज दुपारी हा प्रकार घडला.
या गोळीबाराचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी फ्लॅटच्या इंटिरियर डेकोरेशनचे काम करण्यावरून हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे.
चोळे गावातील बालाजी नगर परिसरात देवी शिवामृत नावाची इमारत असून त्याच्या तळ मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटचे काम करायचे होते. इंटेरियर डेकोरेशनचे हे काम किशोर चौधरी आणि नितीन जोशी यांनी घेतले होते.
मात्र या परिसरात राहणारे भोईर कुटुंबियही या कामासाठी इच्छुक होते. परंतु त्यांना हे काम न मिळाल्याने त्यांनी हा गोळीबार केल्याची माहिती किशोर चौधरी यांच्या एका नातेवाईकाने दिली.
या गोळीबारात जबर जखमी झालेल्या किशोर चौधरी याचा रुग्णालयात मृत्यू झाला असून नितीनवर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक पोलीसांसह कल्याण क्राईम ब्रॅंचने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर या प्रकारानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली..
ही हत्या इतकी निर्घृण करण्यात आली की मृत किशोर याच्यावर डोक्यात आणि छातीत तब्बल 14 गोळ्या झाडण्यात आल्या..या अतिशय निर्घृण हत्येनं परिसरात एकच खळबळ माजली आहे..