www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नवीन वर्षात राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना खूश करण्याचं सरकारनं पक्कं केलेलं दिसतंय. याचं कारण म्हणजे, नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याचे केवळ पाचच दिवस काम करावं लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे आठवड्यातून केवळ पाच दिवस शासकीय कामकाज करावे लागणार आहे. या निर्णयावर सरकारने जवळपास शिक्कामोर्तब केलंय. या निर्णयाचा राज्यातील सुमारे २० लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, शिक्षक-शिक्षकेतर आदी. कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
याबरोबर ८० वर्षे वयावरील निवृत्तिधारकांना त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे पेन्शन तसंच आरोग्याच्या तक्रारी ध्यानात घेऊन वैद्यकीय सवलत देण्याचंही सरकारने कबूल केलंय. शासकीय कर्मचारी-अधिकारी कर्तव्यावर असताना त्यांना मारहाणीचे, धमकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. विशेषतः लोकप्रतिनिधींकडून केली जाणारी मारहाण आणि दमदाटी करण्याच्या प्रकरणांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यास आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका लोकप्रतिनिधी कायद्यात बदल करून काही तरतूद करता येईल का, याविषयी सरकार विचार करीत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.