नागपूरमध्ये 70 किलो गांजा जप्त, तीन महिलांना अटक

नागपूर रेल्वे सुरक्षा पथकाने दक्षिण एक्सप्रेसच्या सामान्य बोगीतून लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. तीन महिलांकडून हा ७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे

Updated: Dec 30, 2016, 10:42 PM IST
नागपूरमध्ये 70 किलो गांजा जप्त, तीन महिलांना अटक  title=

जितेंद्र शिंगाडे, नागपूर : नागपूर रेल्वे सुरक्षा पथकाने दक्षिण एक्सप्रेसच्या सामान्य बोगीतून लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. तीन महिलांकडून हा ७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे

गेल्या काही काळात नागपूर शहर गांजा तस्करीचं केंद्र म्हणून उदयास येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नागपूरमार्गे देशाच्या इतर भागात गांजा तस्करी केली जाते. या संदर्भात गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा पथकाने गुरुवारी दक्षिण एक्सप्रेसच्या सामान्य बोगीतून २५ किलो गांजासह एका महिलेला अटक केली होती. ह्या घटनेची कारवाई पूर्ण होण्याआधीच पुन्हा नागपूर रेल्वे सुरक्षा पथकाने दक्षिण एक्सप्रेसच्याच सामान्य बोगीतून सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करून तीन महिलांना अटक केली आहे.

रॅकेट उद्ध्वस्त होणार?

गांजा तस्करीचं रॅकेट देशाच्या प्रत्येक शहरात विस्तारलेलं आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत एकट्या नागपूर शहरातून कोट्यवधींचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये मालिका बीबी कुट्टूम शेख, सीमा अब्दुल शेख आणि चंद्रीका बेरूस्वामी यांचा समावेश असून त्या गांजा तस्करीच्या रॅकेटमधील सक्रिय सदस्य आहेत.

तीनही आरोपी महिला या गुरुवारी रात्री विशाखापट्टणम येथून गांज्याचे ७० पॅकेट विविध बॅगामध्ये घेऊन दिल्लीसाठी निघाल्या होत्या. सर्व पॅकेट तीन बॅग्समध्ये कपड्यांच्या खाली लपवण्यात आले होते. दक्षिण एक्सप्रेस फलाट क्रमांक १ वर आल्यानंतर सामान्य बोगीची तपासणी सुरु असताना अनेक बॅगांमध्ये गांजा लपवण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सूत्रधार दिल्लीत...

देशाच्या विविध भागात गांजा तस्करी करणाऱ्या रॅकेटचे सूत्रधार दिल्लीत बसून गरीब महिलांच्या मार्फत गांजाची वाहतूक करतात. एका फेरीसाठी ५ हजार रुपये मिळत असल्याने गरीब महिलासुद्धा या रॅकेट मध्ये सहभागी होत असल्याचं तपासात उघड झालं आहे. केवळ ४ दिवसात ३ वेळा कारवाई करत नागपूर रेल्वे सुरक्षा पथकाने किमान १०० किलो पेक्षाही जास्त गांजा जप्त केल्याने अमली पदार्थानी तस्करी करणाऱ्याचे धाबं दणाणलं आहे.