सावधान! गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारा डिलिव्हरी बॉय गजाआड

ग्राहकांना सावधान करणारी महत्त्वाची बातमी... तुमच्या घरी गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून प्रत्येकवेळी सिलेंडरचं वजन करूनच घ्या. तुमच्या गॅस सिलेंडरमधला गॅस आधीच काढून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Updated: May 18, 2015, 11:12 PM IST
सावधान! गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारा डिलिव्हरी बॉय गजाआड  title=

नाशिक: ग्राहकांना सावधान करणारी महत्त्वाची बातमी... तुमच्या घरी गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून प्रत्येकवेळी सिलेंडरचं वजन करूनच घ्या. तुमच्या गॅस सिलेंडरमधला गॅस आधीच काढून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिकमध्ये ग्राहकांच्या घरी सिलेंडर घेऊन येणारी ही गाडी आज अंबड पोलिसांच्या ताब्यात आहे. घरोघरी सिलेंडर पोहोचवणारा वैजनाथ विष्णू उजगरे हा डिलिव्हरी बॉय पोलीस कोठडीची हवा खातोय. सिलेंडर उचलून प्रत्येकाच्या घरी नेण्यापेक्षा त्याचा काळाबाजर करण्याचा सोपा मार्ग त्यानं निवडला. जुने सिडकोच्या पांगरे मळा परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये वैजनाथ त्याच्या साथीदारासह एका सिलेंडरमधला गॅस दुसऱ्या सिलेंडरमध्ये टाकण्याचा काळाबाजार करत होता. क्राईम ब्रँचच्या युनिट ३ शाखेनं अखेर हा अड्डा उध्वस्त केला. प्रत्येक सिलेंडरमधून एक ते दीड किलो गॅस काढून त्याचा काळाबाजार केला जात होता. 

दिड ते दोन महिने पुरणारा गॅस महिन्याच्या आत संपत असल्याच्या तक्रारी महिला अनेक दिवसांपासून करत होत्या. मात्र कोणीही या तक्रारींची दखल घेत नव्हते. गॅस एजन्सीही या प्रकरणी आपला काही संबंध नसल्याचं सांगत आहे. तसंच वजन करूनच सिलेंडर ताब्यात घ्यावा असं सांगितलं गेलं. 

याआधीही असे प्रकार उघडकीला आले आहेत. यानंतरही हे प्रकार होणार नाहीत याची काहीच शाश्वती नाही. त्यामुळे हे प्रकार होऊच नयेत यासाठी पुरवठा विभाग काय पावलं उचलतं याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर एका डिलिव्हरी बॉयला प्रत्येक सिलिंडरमध्ये दहा ते १५ रूपये मिळतात. ग्राहकाकडूनही ते पाच दहा रूपये वसूल करतात. दिवसाकाठी नऊशे ते हजार रूपयांपर्यंतची कमाई ते करतात. मात्र गॅसचा काळाबाजार केल्यावर त्यांना शेकडो रूपये मिळतात. ग्राहकांना पडणारा भुर्दंड मोठा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.