मीरा भाईंदर : केडीएमसी महापालिकेतील गटारीची नशा उतरली नसताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 'माशाचा पाडा' या शाळेच्या आवारात रविवारी डीजेच्या ठेक्यावर गटारीची जंगी पार्टी पार पडली.
या पार्टीचं आयोजन प्रभाग समिती ६ चे सभापती अनिल भोसले यांनी केल्याचा आरोप होत आहे. या पार्टीच्या चौकशीचे आदेश आयुक्त अच्युत हांगे यांनी दिले आहेत.
भाजपचे सभापती अनिल भोसले यांनी आपल्या समर्थकांना खुश करण्यासाठी रविवारी काशिगावच्या माशाचा पाडा येथील पालिका शाळेच्या आवारात गटारीचा बेत आखला होता.
रविवारी शाळा बंद असल्याने त्याची चावी परिसरातच राहणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडे होती. ती सभापतीचा धाक दाखवून आणल्याचे सांगितले जात आहे. या संतापजनक प्रकाराला पालिकेचे शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांनी दुजोरा दिला असून आयुक्तांनीही गंभीर दखल घेत देशमुख यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
शाळेच्या आवारात साधा गुटखा, तंबाखू खाणे बंदी असतानाच सभापती भोसले यांनी ओली पार्टी करून नियमाला हरताळ फासला आहे. या शाळेची चावी घेऊन पार्टीसाठीही लाईट, हॉलचा वापर करण्यात आला.
याबाबत स्पष्टीकरण देताना भासले यांनी 'गटारीच्या पार्टीचे आयोजन केले होते. पण ती शाळेत नाही तर त्या शेजारी असणाऱ्या एका खाजगी जागेत आयोजित करण्यात आली होती. काही असंतुष्टांकडून यात आपल्याला नाहक गोवण्यात येत आहे' म्हटलंय.