जळगाव : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यात जलयुक्तशिवार योजनेतून बांधण्यात आलेले साखळी बंधारे पहिल्याच पावसांत भरल्याने या बंधाऱ्यांची पाहणी करून जलपूजन केले.
टाकरखेडा, मोयखेडा, वाकोद येथील बंधाऱ्यांचे जलपूजन केल्यानंतर महाजन ग्रामस्थांच्या आग्रहाखातर त्यांच्या जामनेर मतदारसंघातील पाळधी गावाजवळील जलयुक्तशिवार योजनेतून बांधण्यात आलेल्या साखळी बंधाऱ्याच्या जलपूजनासाठी गेले.
मात्र बंधाऱ्याकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. सरकारी गाड्यांचा ताफा तर या ठिकाणी पोहचणे शक्य नव्हते, ग्रामस्थांच्या आग्रहाखातर त्यांना जलपूजन करण्यासाठी ट्रॅक्टरशिवाय पर्याय न उरल्याने स्वतः गिरीश महाजन यांनी २ किलोमीटर ट्रॅक्टर चालवत नेले. यावेळी असंख्य कार्यकर्ते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसले होते. ट्रॅक्टरवर जाऊन त्यांनी जलपूजनाचा कार्यक्रम पार पाडला.