औरंगाबाद : मुलीचा जन्मदर वाढवा या करिता अनेक स्तरातून प्रयत्न केले जातात. मात्र औरंगाबादेत एका सलूनने अनोखा उपक्रम राबवत मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे. मुलीचा जन्म झाल्यास दोन महिने एकवीस दिवस दाढी कटिंग मोफत देऊन हा अनोखा उपक्रम राबवला जातोय.
औरंगाबादच्या जटवाडा रोडवरील या सलूनमध्ये मुलीच्या जन्माचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वागत केलं जातंय. 2017 पासून मुलीचा जन्म झालेल्या कुटुंबीयांसाठी अनोखी योजना सुरू करण्यात आलीय. ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होईल त्या कुटुंबाला दोन महिने एकवीस दिवस दाढी कटिंगची मोफत सेवा देण्यात येणार आहे. इतकंच नाही तर मुलीचे जावळं देखील मोफत काढून देण्यात येणार आहे.
सुमित पंडित यांना दोन वर्षाची मुलगी आहे. मुलीच्या जन्मापासून त्यांची भरभराट झाल्याने त्यांनी तीचं नाव लक्ष्मी ठेवलं. तिच्याच दुस-या वाढदिवसाला इतर खर्च करण्यापेक्षा त्यांनी हा अनोखा उपक्रम राबवत मुलीच्या जन्माचा सन्मान केलाय. त्यांच्या या योजनेला त्यांच्या दुकान मालकानं प्रोत्साहन देत एक महिन्याचं दुकान भाडंही त्यांना माफ केलं. नागरिकांनीही या योजनेचं भरभरुन कौतुक केलंय.
मुलीचा जन्मदर वाढवा यासाठी औरांगाबादच्या पंडित कुटुंबानं अनोखी योजना सुरू केलीये. इतरांनी सुद्दा आपआपल्या परिनं प्रयत्न केले तर निश्चितच मुलींच्या जन्माचा ख-या अर्थानं महोत्सव साजरा होईल यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.