प्रणव पोळेकर, रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील गोविंदगड किल्ल्याचा डोंगर ५ फुटांनी खचला. या खचलेल्या डोंगराखाली तब्बल १०० हून अधिक घरं आहेत. या शंभर घरातील शेकडो व्यक्तीचं आयुष्य धोक्याच्या छायेखाली आहे.
दापोलीच्या दाभोळ खाडी किनारी असलेला डोंगर नागरी वस्तीवर आला आणि या कोसळणाऱ्या डोंगरानं पाच जणांचं आयुष्य पूर्णत: उद्धवस्त केले. रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळसारखी एकूण ७९ ठिकाणं धोकादायक असल्याचं निष्पन्न झालंय.
हे सरकारी आकडे समोर येत असतानाच चिपळूणचा गोविंदगड खचलाय. या गडाची रचनाही दाभोळसारखीच आहे. समोर खाडीचं पात्र आणि बाजूला असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी शेकडो घरं. मोठ्या प्रमाणात पाणी मुरल्यानं डोंगराखील या भेगा दिवसेंदिवस वाढू लागल्या. डोंगराचा हा मोठा भाग पायथ्यांशी असलेल्या १०० घरांकडे हळूहळू सरकू लागलाय.
प्रशासनानं या सर्व कुटुंबांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा दिलाय. मात्र हा डोंगर कोणत्याही क्षणी खाली येईल या भितीखालीच रहिवाशी इथे वावरतायत. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत डोंगर खचून घरं गाडली जाण्याची ही चौथी घटना आहे.
२००५ साली चिपळूणच्या मुंडे पायरवाडी येथे अशीच घटना घडली होती. त्यानंतर ३० सप्टेंबर २००९ रोजी राजापूर वडदहसोळ येथे ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर त्यानंतर दापोलीच्या हर्णेमध्ये १८ जून २०१०मध्ये डोंगर घरावर कोसळून येथेही ८ जणांनी आपले प्राण गमावले होते.
कोकणातील भौगोलिक रचनेमुळेच अशा घटना होतायत असं भुगर्भशास्त्रज्ञ दिलीप महाले यांनी म्हटलंय. घरामागचा डोंगर मृत्यू बनून घरावर येण्याची शक्यता असतानाही पिढ्यानपिढ्यांची वडिलोपार्जित घरं सोडण्याची मानसिकता स्थानिक दाखवत नाहीत हीच यातली मोठी अडचण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.