बुलडाणा : बुलडाण्यातल्या सैलानी बाबाच्या यात्रेतला हा अघोरी प्रकार चीड आणणारा. डोळ्यात लिंबू पिळणं, त्यांचे केस धरुन होळीभोवती फिरवण्याचे अघोरी प्रकार उपचारांच्या नावाखाली केले जात आहेत. मात्र, जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सैलानी बाबाच्या यात्रेत देशभरातून लोक येतात. त्यात मनोरुग्णांची संख्या जास्त असते. मनोरुग्णाच्या अंगावरून नारळ ओवाळून होळीत टाकल्यास रुग्ण बरा होतो असा यात्रेकरुंचा समज आहे. त्यामुळे मनोरुग्णाच्या अंगावरून नारळ, लिंबू ओवाळून टाकलं जातं, त्यांच्या अंगावरील कपडे होळीमध्ये टाकले जातात.
एवढ्यावरच हे थांबत नाही तर मनोरुग्णांना मारहाण करणं, त्यांच्या डोळ्यात लिंबू पिळणं, त्यांचे केस धरुन होळीभोवती फिरवण्याचे अघोरी प्रकार उपचारांच्या नावाखाली केले जातात. खरं तर असे अघोरी प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी स्वत:हून कारवाई करणं अपेक्षित आहे. मात्र कुठलीही कारवाई करण्याऐवजी पोलीस बघ्याच्या भूमिकेत दिसून येतात.
अघोरी प्रकारांना आळा बसावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिका-यांना एक निवेदन दिलं. त्यानंतर जिल्हाधिका-यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेशही दिले. प्रत्यक्षात काहीही कारवाई होत नसल्याचा आरोप अंनिसने केलाय.
एकीकडे जादूटोणा विरोधी प्रतिबंधक कायदा सरकारनं केलाय. मात्र असे अघोरी प्रकार पाहिल्यानंतर खरोखरीच त्याची अंमलबजावणी होतेय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.