नको नको रे पावसा...

राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. चंद्रपूर, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून चौघांचा यांत बळी गेलाय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 20, 2013, 07:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. चंद्रपूर, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून चौघांचा यांत बळी गेलाय..

चंद्रपुरात पावसानं धुमाकूळ घातलाय.. अतिवृष्टीमुळे हजारो घरं पाण्याखाली गेलीत.. तर कित्येक घरांची पडझड झालीय.. चंद्रपूर ताडोबा मार्गावरचा महत्वाचा पूल खचल्यानं ताडोबा मार्ग बंद झालाय... त्यामुळं पावसाचा फटका ताडोबातल्या पर्यटकांनाही बसलाय. चंद्रपुरातच नाहीतर विदर्भातही वरुणराजा चांगलाच बरसतोय... नागपुरात शुक्रवारी संध्याकाळपासून मुसळधार पास सुरु आहे..

अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे.. अकोल्यातल्या वाण धरणाचे 4 तर यवतमाळमधल्या अरुणावती धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत... वैनगंगा, इरई नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी वस्त्यांमध्ये शिरलंय... अंबाझरी तलाव भरुन वाहू लागला असून अप्पर वैतरणा धरणाचे अर्धा फुटाने उघडलेत...
वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय.. मुंबई-नागपूर, नागपूर-हैदराबाद रेल्वेसेवा विस्कळीत झालीय.. अमरावतीमध्येही धो धो पावसामुळं अप्पर वर्धा धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत..
विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही गेल्या 24 तासात मुसळधार पावसानं थैमान घातलंय..जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचल्याने कोल्हापूरकरांना पाण्यातून वाट काढत जावं लागलं.. या पावसामुळं कोल्हापुरातल्या जलाशयात वाढ झालीय.. राधानगरी, वारणा धरण जवळपास भरलं असून पंचगंगा नदीसह सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे चांदोली धरण ८३ टक्के भरलंय.. धरणाचे दरवाजे उघडले असल्याने वारणेच्या पाणीपातळीत वाढ झालीय.. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. येत्या काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय.. त्यामुळं नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.