नाशिक : नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये अजून एक घोटाळा समोर आलाय. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेला वॉटरमार्क उलटा छापल्याने कोट्यवधी रूपये किंमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकऱणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत आणि सहा कर्मचाऱ्य़ांना नोटीस देण्यात आलीय.
नाशिक जेलरोडवर असलेली करन्सी नोट प्रेस... या प्रेसमध्ये वीस रूपयांपासून ते हजाराच्या नोटा छापल्या जातात. या नोटात महत्तावीच असते चांदीची सुरक्षा तार आणि गांधीजींचा वॉटर मार्क...मात्र हा वॉटर मार्क उलटा छापला गेला तर नोट बनावट असल्याची शंका येते. असाच गांधीजींचं चित्र असलेला वॉटर मार्क उलटा छापण्यात आल्याची चर्चा कामगारांमध्ये आहे. या प्रेसमध्ये आवश्यक असलेला कागद परदेशातून येतो. कोट्यवधी डॉलर्स खर्चून हा सुरक्षित खुणा असलेला कागद तयार होता. गेल्या वर्षी असाच तीस टन कागद वॉटर मार्क उलटा छापल्याने जाळून टाकण्यात आला. वेस्ट जाळण्यासाठी असलेली भट्टी अपुरी असल्याने सीएमटी तीनच्या आवारात खड्डा करून जाळण्यात आल्याची चर्चा कामगारांत रंगली. कामगार संघटनेचे माजी अधिकारी टी एन आडके यांनी या प्रकाराला दुजोरा दिलाय.
देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणारे ते 'देशद्रोही'
या प्रेसमध्ये हजारांच्या काही कोटी नोटा सुरक्षा तारेशिवायच छापण्यात आल्याचं नुकतंच उघड झालं होतं. या दोन्ही प्रकरणात किमान पन्नास हजार कोटी रूपयांचं नुकसान महामंडळाचं झालं. महामंडळ झाल्यापासून अनिर्बंध कारभार या प्रेसमध्ये होत आहे. यातून देशाचंही आर्थिक नुकसान होत आहेच पण त्यापेक्षाही देशाच्या सुरक्षेशी खेळ केले जात आहेत. नोटांचा महागडा कागद जाळल्याने महामंडळात देशद्रोह्यांची संख्या वाढल्याचं समोर आलंय. या देशद्रोह्यांना तातडीने शोधण्याची मागणी माजी सचिवांनी केलीय.
या प्रेसमध्ये होत असलेल्या या घोळामागे नवा तेलगी असल्याची चर्चा सुरू झालीय. गरज आहे या तेलगीला शोधून काढण्याची... त्यासाठी कामगारांनी एकजूट होऊन लढा देण्याची...