नागपूर : 'बळीराजाची बोगस बोंब' या नावाचा अग्रलेख लिहून तमाम शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या एका वृत्तपत्राच्या संपादकाचा आज विधानसभेत आ.जितेंद्र आव्हाड यांच्या सहित सर्व पक्षीय आमदारांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे आ.विजय औटी यांनी या अग्रलेखाच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला होता. यावेळी बोलताना आ.जितेंद्र आव्हाड म्हणाले मंगळवार दि.१६ डिसेंबर रोजी एका वृत्तापत्रातून 'बळीराजाची बोगस बोंब' या नावाने बोगस अग्रलेख प्रसिध्द करुन दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीटीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या दैनिकाच्या संपादकाने केले आहे.
या अग्रलेखात शेतकऱ्यांसंदर्भात चुकीची व खालच्या स्तराची भाषा वापरली गेली असून ही भाषा निषेधार्ह आहे. या संपादकाने राज्यातील बळीराजाची वस्तूस्थिती डोळ्यासमोर न ठेवता हा अग्रलेख लिहला आहे. अशा प्रकारचा अग्रलेख लिहून या दैनिकाच्या संपादकाने गोरगरिब शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
आमचा बळीराजा ज्या मातीत आपली शेती पिकवितो त्या मातीला तो आपली 'काळी आई' मानतो. त्या आमच्या काळ्या आई विषयी देखील या संपादकाने चुकीची भाषा वापरली आहे. आमचा बळीराजा गरीब असून तो सावळ्या विठूरायाची पूजा करतो. तो श्रीमंत वर्गाचा देव असणाऱ्या कुबेराची पूजा तो करीत नाही.
सध्या दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीटी मुळे शेतकऱ्याची अवस्था ही दयनीय अशी झाली आहे.त्यामुळे सत्ताधारी-विरोधक,माध्यमे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नी गंभीर आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या करीत आहेत. परंतु सध्या विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुबेर भक्तांना हे शेतकऱ्यांचे हित पाहवत नसल्यानेच अशा प्रकारचे अग्रलेख लिहून ते आमच्या गोरगरिब शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत.
या दैनिकाच्या संपादकाने शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या इतर माध्यमांना ,राजकीय नेत्यांना देखील मूर्ख ठरविले आहे.अशा प्रकारचे लिखाण निषेधार्ह असून मी या अग्रलेखाचा निषेध करतो.
शिवसेनेचे आ.विजय औटी यांनी या संपादकाला आपली पाच एकर जमीन कसण्यासाठी देऊ या संपादकाने आपली जमीन कसून बायका-मुलांना सोन्यानं मडवून दाखवावं असं आव्हान दिलं.
या अग्रेलखाचा राधाकृष्ण विखे-पाटील, आ.छगन भुजबळ, आ.आशिष शेलार,बाळासाहेब थोरात यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. शेवटी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची भावना लक्षात घेऊन अग्रलेखाच्या संपादकाचा निषेध करीत यापुढे अशा प्रकारे लेखन वृत्तपत्रातून होणार नाही याबाबत सूचना केल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.