कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांना शनिवारी लाच घेतल्या प्रकरणात रंगेहात पकडण्यात आले. आज पोलिसांकडून अटक होण्याच्या आधीच त्या रुग्णालयात दाखल झाल्यात. दरम्यान, अटकेच्या भीतीपोटी त्या आजारी पडल्याचे बोलले जात आहे.
मात्र, मला राजकीय आकसापोटी षडयंत्र रचण्यात आल्याचे तृप्ती माळवी यांनी म्हटले आहे. माझे अस्तीत्व संपविण्यासाठी हा डाव, असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तृप्ती माळवी यांना त्वरित अटक केली जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी आफळे यांनी दिली. दरम्यान, शिवसेनेने आंदोलन करत त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
माळवी यांनी आजारीपणाचे सोंग घेतल्याची चर्चा कोल्हापूरमध्ये रंगली आहे. त्या सध्या कोल्हापूरच्या राजरामपुरीतील मोरया रुग्णालयात उपचार घेत आहेत. महापौर तृप्ती माळवी आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाविरुद्ध शुक्रवारी लाच घेतल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज, शनिवारी त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
संतोष हिंदुराव पाटील यांनी माळवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पाटील यांच्या भूखंडावर महापालिकेचे आरक्षण आहे. हे आरक्षण उठविण्यासाठी पाटील यांच्याकडे महापौरांनी ४० हजार रूपयांची लाच मागितली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.