मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू प्रयत्नशिल आहेत. आता कोकण रेल्वे मार्गावर ज्येष्ठ प्रवाशांसाठी ‘श्रावण सेवा’ सुरु केलेय.
या उपक्रमाखाली कोकणात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकांवर सामानाची ने-आण करण्यासाठी विशेष सुविधा कोकण रेल्वेमार्फत सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सेवा प्रवाशांना मोफत मिळणार आहे. त्यासाठी एक एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर ज्येष्ठांना ही सेवा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊ शकेल.
कोकणात येणाऱ्या ज्येष्ठांसाठी कोकण रेल्वेकडून विनामूल्य ही सेवा दिली जात आहे. प्रवासाच्या चार तासापूर्वी प्रवाशांना गाडीचे नाव, पीएनआर नंबर, डबा, आसन क्रमांक आदी आवश्यक माहिती मोबाईल क्रमांक 09664044456 वर एसएमएस करायचा आहे. त्यानंतर संबंधित रेल्वे स्थानकावर श्रावण सेवा पुरवली जाईल. चिपळूण, रत्नागिरी, थिवीम, करमाळी आणि मडगाव आदी स्थानकांवर सेवेचा ज्येष्ठांना लाभ घेता येणार आहे.
Konkan Rail “Shravan Seva” for Sr Citizens Help to carry luggage Chiplun,Ratnagiri,Thivim,Karmali,MadgaFREE 1600already used service.
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) December 28, 2015
सामान वाहून नेण्याबरोबर ज्येष्ठ प्रवाशांना गाडीमधून उतरण्यासाठीही हात दिला जाणार आहे. आतापर्यंत १६०० प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.