गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा

जळगाव जिल्ह्यातल्या गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरु आहे. मात्र या चोरीची प्रशासनाला ना खेद न खंत. ठेकेदार आणि अधिकारी यातून गब्बर झाल्याची चर्चा आहे.

Updated: Jul 6, 2014, 06:12 PM IST
गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा title=
फाईल फोटो

जळगाव: जळगाव जिल्ह्यातल्या गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरु आहे. मात्र या चोरीची प्रशासनाला ना खेद न खंत. ठेकेदार आणि अधिकारी यातून गब्बर झाल्याची चर्चा आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या गिरणा नदीच्या वाळूला सोन्याप्रमाणं भाव आहे. केवळ जळगाव आणि धरणगाव तालुक्यात २२ ठिकाणी वाळूच्या साईट्स आहेत, त्यापैकी अनेक साईट्सच्या निविदाच न निघता मोठ्या प्रमाणात वाळूचं अवैध उत्खनन चालतं. 

‘खेडी’ गावातील गिरणा नदीच्या या साईट्सचा ठेकाच दिलेला नाही, तरीही या ठिकाणी डंपर, ट्रक्टरद्वारे असा मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. आव्हाणे गावाजवळ ५ हजार ब्रास चाच उत्खननाचा ठेका देण्यात आलाय, प्रत्यक्षात मात्र इथून ५० हजार ब्रास वाळूचा उपसा झालाय. याबाबत अनेकवेळा तक्रारी होतात. मात्र कारवाई काही होतांना दिसत नाहीय. 

गिरणा नदीपात्रातून रोज असा वाळूचा उपसा सुरु आहे, त्यातून ठेकेदार कोट्यावधींचा मलिदा अक्षरशः ओरबाडताहेत, यात काही अधिकारीही छुपे भागीदार असल्याचा आरोप होतोय.

राज्यावर सध्या अवर्षणाची गडद छाया पसरलीय, पाणीटंचाईचं सावट आहे, अशा परिस्थितीत धरणे नद्यांचे पात्र कोरडे होऊ नये म्हणून सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, मात्र जिथं पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत तिथेच वाळूचा उपसा सुरु आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.