अंबरनाथ : हजार आणि ५००च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला एक आठवड्याहून जास्त वेळ झाला, मात्र नागरिकांचे हाल काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत, दिवसेंदिवस या समस्येमध्ये भरच पडत आहे.
बँक उघडण्याची वेळ जरी १० आणि ११ ची असली तरी गेल्या एक आठवड्यापासून जनतेची ड्युटी मात्र पहाटे पासूनच सुरु झाली आहे. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर, वांगणी तसेच अंबरनाथ ग्रामीण भागातील जनता पहाटे ६ वाजल्यापासूनच बँका, ATM आणि पोस्ट ऑफिसच्या बाहेर रांगा लावण्याचे काम करीत आहेत.
आपला नंबर पहिला यावा आणि पैसे घेऊन लवकर घरी जाता यावे याकरिता अनेक वयोवृद्ध नागरिक, महिला, तरुण बँक, पोस्ट ऑफिस सुरू होण्याच्या चार ते पाच तास अगोदरच पहाटे पासून बँकांच्या बाहेर रांगा लावत आहे.
ATM मधून पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र ATM अनेक वेळा बंद असल्याने बंद टाळ्या कडे पाहत पुन्हा बँकांच्या गर्दीत धक्के खात तासंतास उभे राहावे लागत आहे.गेल्या एक आठवड्यापासून ही गर्दी काही कमी होण्याचो चिन्हे नाहीत. त्यामुळे गृहिणी,सर्वसामान्यांना या निर्णयाचा त्रास होत आहे. मुळात २००० हजारांच्या नोट ऐवजी ५० आणि १००च्या नव्या नोटा चलनात आणायला हव्या होत्या असे नागरिकांचे म्हणणे आहे. अंबरनाथ मध्ये सर्व बँकांच्या बाहेर नागरिक हे पहाटे पासूनच रांगेत उभे आहेत.