मराठवाड्यातील दलित नेते एकनाथ आवाड यांचं निधन

मराठवाड्यातील दलित नेते अॅड. एकनाथ आवाड यांचं आज सकाळी हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झालं. आवाड यांच्या निधनानं दलित चळवळीत पोकळीत निर्माण झाली अशी भावना व्यक्त होत आहे. 

Updated: May 25, 2015, 10:54 AM IST
मराठवाड्यातील दलित नेते एकनाथ आवाड यांचं निधन  title=

बीड: मराठवाड्यातील दलित नेते अॅड. एकनाथ आवाड यांचं आज सकाळी हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झालं. आवाड यांच्या निधनानं दलित चळवळीत पोकळीत निर्माण झाली अशी भावना व्यक्त होत आहे. 

बीडमधील एका छोट्या गावात एकनाथ आवाड यांचा जन्म झाला होता. मातंग समाजात जन्मलेले एकनाथ आवाड यांचे बालपण हलाखीच्या स्थितीत गेले. जातीव्यवस्थेचे चटके सोसल्यावर आवाड यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. पोतराज प्रथेला विरोध दर्शवत आवाड यांनी दलितांसाठी पहिला लढा दिला. यानंतर जातीभेद, नामांतर चळवळ, सावकारकी, एक गाव एक पाणवठा असे असंख्य लढे त्यांनी दिले. 

मानवी हक्क अभियान या मोहीमेतून आवाड यांनी भूमीहिनांना गायरान जमीन कसण्यासाठी द्यावी यासाठी आंदोलन उभं केलं. या आंदोलनाचं फळ म्हणजे मराठवाड्यातील ५० हजार भूमीहिनांना गायरानाच्या माध्यमातून उदरनिर्वाहाचं साधन मिळालं आहे. संयुक्त राष्ट्राच्या जिन्हिवा इथल्या राष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 

गेल्या काही दिवांपासून आवाड यांना पोटाच्या आजारानं ग्रासलं होतं. यासाठी त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.