औरंगाबाद : आजवर आपण शिक्षकांची अनेक अधिवेशनं पाहिलीत. कधी सरकारी अनुदान घेऊन शाळेला थेट दांडया मारुन भरणारे अधिवेशन तर कधी शिक्षकांच्या व्यासपीठावर रंगणारं राजकारणाचं अधिवेशन. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तंत्रज्ञानाची साथ घेत औरंगाबादेत राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन भरलं.
कोणी लँपटॉपवर तर कोणी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत तर काहीजण व्यासपीठावरील सुरु असलेल व्याख्यान ऐकत आहेत. सर्व प्रकार पाहून इथं चालल काय असा प्रश्न पडला असेल. मात्र हे सुरु आहे राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे अधिवेशन. शिक्षकांनी आधुनिक हायटेक साधन वापरत विद्यार्थ्यांना ज्ञान कसं देता येईल यासाठीचे हे अधिवेशन आहे.
या अधिवेशनला उपस्थित असणारे हे शिक्षक सुद्धा सर्व व्हॉट्सअप ग्रुपचे अँडमीन आणि सदस्य आहेत. हे शिक्षक राज्यात जिल्हापरिषद आणि महानगर पालिकांच्या शिक्षकांचा शैक्षणिक ग्रुप चालवतात. राज्यात शैक्षणिक कार्य करत असलेल्या शिक्षकांनी सोशल मीडियाचा फायदा घेत जवळपास ६४ व्हाटस अप ग्रुप आणि जवळपास ४४ हाईक ग्रुप तयार केलेत.
याच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला जातो. मुख्यतः शिक्षकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याकरिता हे सर्व ग्रुप काम करत आहे. या सर्व ग्रुपच्या अॅड्मीन आणि सदस्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करीत शासनाची कुठलीही मदत न घेता हे अधिवेशन भरवलंय.
खुलताबाद येथे घेण्यात आलेल्या या अधिवेशनात राज्यातील महानगर पालिका आणि जिल्हापरिषद शाळेच्या जवळपास दीड ते दोन हजार शिक्षक सहभागी झालेत.. ज्ञान रचनावाद, इलर्निंग, व्हिडिओ एडिटिंग सोशल मिडीयाचा शैक्षणिक वापर या बाबत १८ तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. मराठी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला याचा फायदा होईल असा विश्वास राजेंद्र खेडकर, सुनीता कांबळे या शिक्षकांनी व्यक्त केलाय.
गेल्या दोन वर्षांपासून मराठी शाळांमधील मुलांना आधुनिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यातील शिक्षकांनी घेतलेला हा पुढाकार अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यासारखा आहे. शिक्षकांच्या अधिवेशनांच्या नावावर विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या शिक्षकांनी आणि सोशल मीडियाचा गैर वापर करणाऱ्यांनी नक्कीच या शिक्षकांचा आदर्श घ्यायला हरकत नाही.