नोकरीच्या आमिषानं महिलेवर देह व्यापाराची वेळ...

Updated: Jun 25, 2014, 11:54 AM IST
नोकरीच्या आमिषानं महिलेवर देह व्यापाराची वेळ... title=
फाईल फोटो

 

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या, दोन मुलांची आई असलेल्या एका 25 वर्षीय महिलेचं अपहरण करून तिला मध्यप्रदेशातील खंडवा भागातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. त्यानंतर तिच्यावर देह व्यापारासाठी जबरदस्तीही करण्यात आली, अशी तक्रार महिलेनं पोलिसांत दाखल केलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये या महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर ही घडना सोमवारी रात्री उघडकीस आली.

दोन महिलांनी या महिलेला नोकरी मिळवून देतो, असं सांगून आपल्या जाळ्यात ओढलं. 30 एप्रिल रोजी पंजाब मेलनं या महिला तिला खंडवामध्ये आणण्यात आलं. यानंतर त्या महिलांनी पीडित महिलेला दोन पुरुषांच्या स्वाधीन केलं. या दोघांनी महिलेला दुसऱ्याच एका अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात दिलं. या व्यक्तीनं पहिल्यांदा या महिलेला खंडवाच्या जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला देह व्यापार करण्यासाठी बळजबरीही केली.  

जवळजवळ एका महिन्यापर्यंत पीडित महिला नरक यातना सहन करत होती. पण, संधी मिळाली आणि तिथून ती पळाली... आणि आपल्या कल्याणमधल्या घरी परतली.

पोलिसांनी दोन महिलांव्यतिरिक्त आणखी 10 जणांविरुद्ध महिलेला देह व्यापारात ढकलण्याचा गुन्हा दाखल केलाय. परंतु, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.