प्रणव पोळेकर, रत्नागिरी : केवळ सरकारला मदत केल्याच्या कारणावरून रत्नागिरीत एका कुटुंबाला वाळीत टाकलंय. पाहूयात नेमका काय प्रकार घडलाय तो.
फैय्याज मुजावर. रत्नागिरी जवळच्या शिरगावचा रहिवासी. कुटुंबासह गुण्यागोविंदानं राहणारा फैय्याजला वाळीत टाकण्यात आलंय. त्याचा दोष एवढाच की, त्यानं सागरी महामार्ग रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत स्वत:ची दोन फूट जमीन सरकारला दिली. मात्र हाच राग मनात धरुन समाजातून बहिष्कृत केल्याचा फतवा जामा मस्जिद जमातूल मुस्लिम शिरगावच्या अध्यक्षांनी काढला.
अनेक मिन्नतवाऱ्या करुनही समाजानं आपला निर्णय बदलला नाही. म्हणूनच अन्यायाविरोधात फैय्याजनं जिल्हा पोलीस अधीक्षक तसंच जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली. मात्र काहीही फरक पडलेला नाही. या घटनेचा आमदार उदय सामंतांनी निषेध केलाय. तर गावच्या सरपंचांनी मात्र ग्रामपंचायत फैय्याजच्या पाठिशी उभी असल्याचा दावा केलाय. सरपंच रज्जाक काझी यांनी तसे म्हटलेय.
संदर्भात जामा मस्जिद जमातूल मुस्लिम शिरगावच्या अध्यक्षांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाही. तर या आदेशाशी माझा कसलाही संबंध नसल्याचं सचिवांनी म्हटलंय.
सरकारी कामात मदत केली म्हणून एखाद्या कुटुंबाला बहिष्कृत केलंय. तर मदत करायचं सोडून सरकारी यंत्रणा हात वर करतेय. अशात फैय्याज आणि त्याच्या कुटुंबाला न्याय कसा मिळणार हाच खरा सवाल आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.