मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी कमी मतदान झाल्याचे नोंद झालेय. येथे ४८ टक्के मतदान तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी चांगले मतदान झाले. कोल्हापुरात ६४ टक्के मतदान झालेय. आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता टिपेला पोहचलीय. दरम्यान, कल्याण डोंबिवलीत भाजपा - मनसे कार्यकर्ते भिडलेत. मनसेच्या सुभाष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते नितीन पालन यांच्यावर तलवार हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवलीतील ७५० तर कोल्हापूरमधील ५०६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. कडक उन्हाची तमा न बाळगता कल्याण डोंबिवलीतला मतदार आज मोठ्या संख्येनं बाहेर पडलेला बघायाला मिळाला. भर दुपारी साडे बाराच्या सुमारास मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्यात. आज सकाळी रविवार असूनही कल्याण आणि डोंबिवलीच्या नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्यात. तर कोल्हापुरात विक्रमी मतदान झाल्याने कोणाच्या बाजुने कौल लागणार याची उत्सुकता आहे. या ठिकाणी प्रथमच अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उतरविलेत. भाजपने ताराराणीशी आघाडी केली तर शिवसेना स्वबळावर रणसंग्रमात उतरली.
कल्याण डोंबिवली महापालिका निडवणुकीचा उत्साह २७ गावांमध्येही पाहायला मिळाला. इथेही सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. कल्याणमधले आमदार गणपत गायकवाड यांनी मतदानाचा अधिकार बजावला. मतदारांनी जरुर मतदार करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
केडीएमसी पालिका निवडणुकीत डोंबिवली पश्चिममधील गरिबाचा वाडा प्रभाग क्रमांक ५० हा संवेदनशील प्रभाग बनला आहे. या ठिकाणी सुद्धा शांततेत आणि उत्साहात मतदान सुरु झाले.
कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी मतदानात दुपारच्या सत्रात मतदान केंद्रांवरच्या रांगा वाढल्या आहेत. डोंबिवली पूर्व इथल्या स्वामी विवेकानंद शाळेतल्या केंद्रावर मतदारांच्या गर्दी दिसत होती.
मतदान हा लोकशाहीचा मुलभूत अधिकार आहे. तो बजावण्यासाठी कल्याण डोंबिवलीतले ज्येष्ठ नागरिकही आवर्जून रस्त्यावर उतरले. सकाळपासूनच वृद्धांनीही मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातले नागरिक मतदानाचा आपला मुलभूत अधिकार बजावण्यासाठी मतदान केंदांवर गर्दी करु लागले आहेत. निवडणूक आयोगानं सुद्धा या जागरुक मतदारांचा आगळा वेगळा सन्मान केला. मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या पहिल्या पन्नास मतदारांना, निवडणूक आयोगानं तुळशीचं रोपटं देऊन त्यांचा सन्मान केला. केडीएमसी निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर तरुणाईची गर्दी विशेषपणे दिसून येत होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.