आशिष अम्बाडे, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर म्हणजे राज्याच्या टोकावरचा भाग... राजकारणातील घराणेशाही हे इथलं वैशिष्ट्य मात्र यंदा याला छेद देणारे अनेक घटक इथं उभे ठाकलेत. केंद्रीय गृहराजमंत्री हंसराज अहिर यांचं वर्चस्व कायम राहील? की जनता वेगळा विचार करेल याचं उत्तर राजुरावासीय लवकरच देणार आहेत. 27 नोव्हेंबरला होणा-या निवडणुकीत 18 जागांसाठी 96 उमेदवार रिंगणात असून नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे.
राजुरा... चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख असलेलं क्षेत्र... इथलं राजकारण धोटे या एकाच कुटुंबाभोवती केंद्रित झालंय. सर्व प्रमुख पक्ष 'धोटे' मय आहेत. विधानसभा आणि पालिका अशा दोन्ही प्रमुख ठिकाणी धोटे कुटुंबातील सदस्य आलटून-पालटून सत्ता भोगत असतात. काँग्रेसनं माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू अरुण धोटे यांना उमेदवारी दिलीय. मावळत्या पालिकेत अरुण धोटे राष्टवादीचे नगरसेवक आणि उपाध्यक्ष होते.
काँग्रेसनं आपला उमेदवार धोटेच दिला आणि 'हम भी कुछ कम नही' म्हणत भाजपनं विद्यमान आमदार संजय धोटेंचे बंधू सतीश धोटेंची पालखी राजकारणाच्या वारीत पोहोचवली. आजवर राजुरा नगरपालिकेत एकही भाजप नगरसेवक नाही ही स्थिती बदलण्यासाठी आमदार संजय धोटे आपल्या बंधुराजांसह त्वेषानं कार्यरत झालेत.
धोटेंच्या घराणेशाहीला तन-मन-धनानं विरोध करणारे सर्वच पक्षातील असंतुष्ट सध्या काँग्रेसचे बंडखोर उमेदवार स्वामी येरोलवार यांना शक्ती देतायत. आपला हक्काचा उमेदवार काँग्रेसनं पळवल्यानं हतबल झालेल्या राष्ट्रवादीनं स्वामींना पाठिंबा देत खारीचा वाटा उचललाय. माजी खासदार आणि कामगार क्षेत्रावर भक्कम पकड असलेले काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांनी या भागात येणं टाळलंय. कदाचित 'मौनं सर्वार्थ साधनम्' असा स्वामींसाठी संदेश असेल.
धोटे कुटुंबाची या भागावर असलेली पकड जशी ओबीसीबहूल राजकारणाची आहे तशीच सहकार क्षेत्राचं महत्व जाणून असल्यानंही आहे. धोटे कुटुंबातच सत्ता हवी अन्य कुणी नकोच असा छुपा अजेंडा राबवत यंदाही प्रमुख पक्ष विशेषतः भाजप वेगळा उमेदवार देऊ शकलेला नाही. रिस्क कशाला? असा भाजपचा होरा आहे.
नजिकच्या इतिहासात डोकावल्यास या क्षेत्रावर शेतकरी संघटनेचा उत्तम प्रभाव आहे. माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी प्राचार्य अनिल ठाकूरवार याना मैदानात उतरवत सर्व प्रमुख पक्षांना धडकी भरवलीय तर शिवसेना नेते नितीन पिपरे हे देखील बाण रोखून आहेत. राजुरा शहरातील जनता धोटेंची सरशी करते की वेगळा मार्ग निवडते हे येता काळच सांगणार आहे.