नागराजच्या चित्रपटातील कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्याखाली अटक

सैराट आधी नागराज मंजुळेचा फँड्री चित्रपटही चांगलाच गाजला होता. मात्र २३ लाख रूपयांच्या घरफोडी प्रकरणात फँड्रीतील एका कलाकाराचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Jun 27, 2016, 09:31 PM IST
नागराजच्या चित्रपटातील कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्याखाली अटक title=

पुणे : सैराट आधी नागराज मंजुळेचा फँड्री चित्रपटही चांगलाच गाजला होता. मात्र २३ लाख रूपयांच्या घरफोडी प्रकरणात फँड्रीतील एका कलाकाराचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

आपण नागराजच्या फँड्री चित्रपटात काम केल्याचं १९ वर्षीय आरोपी योगेश चौधरीने म्हटलं आहे. मात्र योगेशचा रोल किती मोठा आणि महत्वाचा होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

 योगेश आणि त्याच्या साथीदारांनी काही दिवसांपूर्वी पर्वती परिसरातील एका नामांकित वकिलाच्या बंगल्यात चोरी करुन १ किलो सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीच्या दागिन्यांसह तब्बल २३ लाख १८ हजाराचा ऐवज लंपास केला होता. ही चोरी उघडकीस आल्यानंतर दत्तवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास सुरू होता.

 गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार, कासेवाडी झोपडपट्टीतील काही मुले पिंपरीत सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी आल्याची खबर मिळाली,  यावरून पोलिसांनी सापळा लावून अमोल अवचरे आणि योगेश चौधरी यांना ताब्यात घेतले.  

योगेशसह  आरोपी अमोल किसन अवचरे , प्रतिक संजय वाघमारे , बिपीन बाळकृष्ण कुलकर्णी आणि सराफ सागर अशोक शहाणे अशी अटक करण्यात आली आहे.