नांदेड : तब्बल 2 कोटी रुपये विजबील थकल्याने नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावासह 4 गावांचा पाणीपुरवठा खंडीत झालाय. चार ग्रामपंचायतींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
नांदेडच्या जिल्हा परिषद अध्यक्षा मंगला गुंडले यांच्या बळीरामपुर या गावासह चार गावांचा पाणी पुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. बळीरामपुर, धनेगाव, वाजेगाव आणि तुप्पा या चार ग्रामपंचायतींनी वीज बील थकवल्याने महावितरणने धनेगाव जलशुद्धीकरण प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत केला आहे.
याच प्रकल्पातून चार गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. आता ऐन हिवाळ्यात या चार गावातील गावक-यांना पाण्यासाठी भटकावं लागत आहे. नियमित पाणीपट्टी भरूनही पाण्यासाठी भटकण्याची वेळ या 4 गावातील ग्रामस्थांवर आली.
आता आपली चूक मान्य करण्याऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागावर दीड कोटींची थकबाकी असल्याचे सांगून या गावांचे सरपंच हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
थकबाकी भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरळीत करणार नाही अशी महावितरणची भूमिका आहे. त्यामुळे या चार गावांचा पाणी पुरवठा सुरू होणार की नाही याबाबत अजून अनिश्चितता आहे. शिवाय ग्रामपंचायतीनी वेळो-वेळी पाणीपटटी वसूल केली. मग ते पैसे गेले कुठे असा सवाल उपस्थित होत आहे.