PWD अधिकाऱ्यांची ग्रँड मस्ती, नाशिकमध्ये मध्यरात्री ओली पार्टी

संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील अति संवेदनशील ओझर विमानतळ शनिवारी रात्री चक्क ओल्या पार्टीत भिजले.  

Updated: Feb 2, 2015, 10:07 AM IST
PWD अधिकाऱ्यांची ग्रँड मस्ती, नाशिकमध्ये मध्यरात्री ओली पार्टी title=

नाशिक: संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील अति संवेदनशील ओझर विमानतळ शनिवारी रात्री चक्क ओल्या पार्टीत भिजले. विशेष म्हणजे ऑर्केस्ट्रा डीजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही पार्टी संरक्षण विभागाची नव्हती, तर सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त रंगल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. 

जानोरी ग्रामस्थांनी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर पार्टी थांबविण्यात आल्याचं समजतं. दिंडोरीचे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी या पार्टीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीसाठी हा रंगारंग कार्यक्रम आयोजित केल्याचं समजतं. खास मुंबईहून मागविलेला रंगारंग ऑर्केस्ट्रा डीजेसह रात्री उशिरापर्यंत सुरू होता. रात्री सव्वानऊ वाजता संगीत रजनीतील लावण्यांचा कार्यक्रम डीजेच्या आवाजात घुमू लागला. त्यामुळं जानोरीचे सरपंच नामदेव उंबरसाडे यांनी ग्रामस्थांसह विमानतळाकडे धाव घेतली. परंतु सुरक्षारक्षकांनी परवानगी घेऊन कार्यक्रम सुरू असल्याचं सांगत त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केल्याचं कळतं. 

सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व बडे अधिकारी, काही मक्तेदार कार्यक्रमाला उपस्थित होते तसंच रात्री दीड वाजेपर्यंत साग्रसंगीत पार्टीचा कार्यक्रम सुरू होता, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. खा. हरिश्चंद्र चव्हाण यांना घडलेला प्रकार समजताच रविवारी त्यांनी विमानतळावर धाव घेत दिंडोरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांना बोलावून घेतलं. मात्र तत्पूर्वी आयोजकांनी घाईगर्दीत मद्याच्या बाटल्या आणि उरलेले खाद्यपदार्थ टेम्पोमध्ये भरून नेल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ओझर विमानतळाला लागूनच नव्यानं झालेल्या विमानतळावर असा कार्यक्रम कसा होऊ शकतो, असा गावकऱ्यांचा सवाल आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.