कैलास पुरी, झी मीडिया पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मध्ये एकीकडं भाजप मध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरु असताना भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांची मैत्री मात्र अनेकांच्या भुवया उंच करायला कारणीभूत ठरतेय... कशी पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्यानंतर तीन स्थानिक नेते कायम चर्चेत असतात...भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, काही महिन्यांपूर्वी भाजपवासीय झालेले अपक्ष आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे दोघे भाजपचे आहेत तर या दोघांमधली आणखी एक समान गोष्ट म्हणजे विलास लांडे. विलास लांडे हे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे अत्यंत जवळचे मित्र तर लांडगे यांचे कट्टर विरोधक. आता महेश लांडगे यांना विलास लांडे यांचं नावही काढलेलं आवडत नाही. मात्र त्याचवेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप मात्र विलास लांडे हे आपले मित्र असल्याचं उघड सांगतात. एवढंच नाही तर या निमित्ताने महेश लांडगे यांना डिवचण्याची एक ही संधी ते सोडत नाहीत...
दुसरीकडं महेश लांडगे यांना मात्र जगतापांचा हा मित्राबद्दलचा दिलदारपणा विशेष रुचलेला नाही.. म्हणूनच भर पत्रकार परिषदेत त्यांच्या समोर झालेला हा संवाद मी ऐकलाच नाही असा दावा त्यांनी केला.
महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप हे भाजपमध्ये आहेत, असं असतानाही जगतापांचं विलास लांडे यांच्यावरच असलेलं प्रेम अनेकांना बुचकळ्यात पाडतंय. अर्थात महेश लांडगे पक्षात जास्त वरचढ व्हायला लागले तर त्यांना रोखण्यासाठी विलास अस्त्र आहे असा संदेश तर जगतापांना द्यायचा नसेल.... ते जगतापचं जाणोत..