काळ्या पाण्याची शिक्षा भोगतंय साताऱ्यातलं हे गाव

पांढरेपाणी, साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या मोरगिरी खोऱ्यामधल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गाव. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 11, 2017, 08:21 PM IST
काळ्या पाण्याची शिक्षा भोगतंय साताऱ्यातलं हे गाव title=

सातारा : पांढरेपाणी, साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या मोरगिरी खोऱ्यामधल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गाव.

५०० च्या आसपास गावाची लोकसंख्या, ज्या सातारा जिल्ह्यातल्या क्रांतिवीरांनी क्रांतीची मशाल देशभर पेटवली त्याच साताऱ्यातलं पांढरेपाणी हे गाव अजूनही काळ्या पाण्याची शिक्षा भोगतंय असंच म्हणावं लागेल.

मोरगिरीपासून १५ किलोमीटरवरच्या या गावात जायला अजूनही रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांचे प्रचंड हाल होतायत.
 
गावात जाण्यासाठी अजूनही रस्ता नाही, शाळा नाही, प्राथमिक शाळेचे वर्ग छपरात भरवले जातात. गेली ५० वर्षे ग्रामस्थ रस्त्याची मागणी करतायत पण सरकारदरबाराकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. रस्ता नसल्यानं दोन गर्भवतींना आपला जीव गमवावा लागलाय. डिजिटल इंडियाच्या घोषणा करणा-या शासनानं आमची आर्त हाक ऐकावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे पांढरे पाणी गाव बफर झोन क्षेत्रात आलंय. या गावावर जंगलात जाण्यावर निर्बंध लादण्यात आल्यानं उपजीविकेसाठी आम्ही करायचं काय? असा प्रश्न गावकरी विचारतायत. स्वातंत्र्यापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पांढरेपाणी गावाचे हाल कधी थांबणार ? लोकप्रतिनिधी, प्रशासनाला आता तरी जाग येणार का हाच खरा प्रश्न आहे.