विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मराठवाड्याचे लोकनेते आणि भाजपचे मोठे नेते अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख.... याच प्रेमापोटी राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडेंचं भव्य स्मारक औरंगाबादेत उभारल्या जाईल अशी घोषणा केली. त्यासाठी शासकीय दूध डेअरीची जागाही ठरवण्यात आली. लवकरच कामाला सुरुवात होईल अशी तयारीही झाली. मात्र याच स्मारकाला आता विरोध व्हायला सुरुवात झालीय.
स्मारकासाठी निवडलेली जागा मोक्याच्या जालना रोडवर आहे. दूध डेअरीच्या ताब्यात असलेली ही जागा तशी रिकामीच आहे. सरकारनं ही जागा निवडली असली तरी कोट्यवधीची जागा स्मारकासाठी का वाया घालवायची असा एमआयएमचा प्रश्न आहे.
गोपीनाथ मुंडेंचं मराठवाड्यासाठीचं योगदान विसरण्याजोगं नाही. त्यामुळेच स्मारकाऐवजी मुंडेंच्या नावानं मोठं हॉस्पिटल उभारावं किंवा ग्रंथालय उभारावं अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलीय.
तर स्मारकाऐवजी रुग्णालय उभारण्याबाबतची सूचना स्वागतार्ह आहे. मात्र हा सूचना माझ्या अखत्यारितील नाही. संबंधित योग्य तो निर्णय घेतील अशी भूमिका पंकजा मुंडेंनी मांडलीय.
केवळ गोपीनाथ मुंडेच्याच नाही तर अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही एमआयएमचा विरोध आहे. लोकांच्या पैशांवर स्मारकाचा घाट नको अशी भूमिका एमआयएमनं घेतलीय. तर एमआयएमच्या या भूमिकेला शिवसेना भाजपकडून विरोध सुरु झालाय. त्यामुळं भविष्यात यावरून राजकीय वातावरण तापणार यात शंका नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.