जालना : शहरातील तालुका जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रभाकर पठाडे असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.
आत्महत्येआधी पठाडे यांनी आपल्या वैयक्तिक डायरीमध्ये आत्महत्या करण्यामागच कारण लिहिले असून या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली. जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पठाडे यांनी आपल्याच सर्व्हिस रिव्होलरव्हरमधून डोक्यात गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केल्यान पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पठाडे यांची पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात ड्युटीवर असताना त्यांना एक फोन आला. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पठाडे हे नियंत्रण कक्षाच्या बाहेर आले आणि त्यांनी सर्व्हिस रिव्हाल्व्हर डोक्याला लावत गोळ्या झाडून आत्महत्या केली.
पठाडे कार्यरत असलेल्या तालुका जालना पोलीस ठाण्यात १ ऑगस्ट रोजी शेख मुजिम शेख कादर या व्यक्तीच्या तक्रारीवरून एका ट्रकचालकाविरोधात पशुखाद्य परस्पर विकून अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण या प्रकरणात पठाडे यांनी ज्या ढाबा मालकाला ड्रायव्हरने पशुखाद्य विकले त्या ढाबेमालकाकडून दोन लाख रुपये घेतल्याची तक्रार शेख मुजिम यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षकांनी पठाडे यांची चौकशी केली .या चौकशीत पठाडे क्लीनचीट मिळाली त्यानंतर देखील शेख मुजिम पठाडे यांच्यावर सतत दबाव आणत असल्याने पठाडे यांनी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे.
आत्महत्या करण्याआधी पठाडे यांनी आपल्या वैयक्तिक डायरीत अडीच पानाची सूसाईड नोट लिहून ठेवली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार या सूसाईड नोटमध्ये पठाडे यांनी आपल्या आत्महत्येला शेख मुजिमशेख कादर हा जबाबदार असल्याचे म्हटलेय. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.