गोंदिया : जिल्ह्यात महावितरणाच्या अधिका-याच्या विरोधात विनयभंग प्रकरणातल्या मुख्य साक्षीदाराच्या घराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. दंडाची रक्कम भरुनही या कुटुंबियांना सध्या अंधारात राहवं लागत आहे. महावितरण विभागाच्या दादागिरीचा एक रिपोर्ट.
गोंदिया जिल्ह्यातील कुडवा गाव. चंद्रकांत सूर्यवंशी. आपण भरलेल्या दंडाच्या रकमेच्या पावतीकडे बघून आपल्या दोन्ही घरांचा वीजपुरवठा केव्हा पूर्ववत होईल याची ते आतुरतेने वाट बघत आहेत. ६ जूनला महावितरणने सूर्यवंशी यांनी भाड्याने दिलेल्या घराचा वीजपुरवठा वीज मीटर सदोष असल्याच्या कारणावरून खंडीत केला. शिवाय २१ हजार ९७० रुपयांचा दंड ठोठावला. सूर्यवंशी यांनी ही रक्कम 28 जूनला भरली. अजूनही त्यांचा वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. इतकेच नव्हे तर 6 जुलैला महावितरणाने त्यांच्या राहत्या घरचे मीटरही अचानक काढून नेला.
महावितरणच्या एक बड्या अधिकाऱ्याच्या विरोधात असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात चंद्रकांत सूर्यवंशी मुख्य साक्षीदार आहेत. त्यातून साक्ष फिरवण्या करिता महावितरण त्यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप सूर्यवंशींनी केलाय. या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केलीय.
या संदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही महावितरणाचे अधिकारी यावर बोलण्यास तयार नाहीत. तर सूर्यवंशी हे आपले मुख्य साक्षीदार असून त्यांच्या विरोधात विचारपूर्वक खोटा गुन्हा दाखल केल्याचे प्राथमिक बाबीतून स्पष्ट होत असल्याची कबुली दिलीय, तक्रारदार यांनी दिलेय.
परिसराला प्रकाशमान करणाऱ्या महावितरण सारख्या विभागाने आपल्या अधिका-यांचे काळे कारनामे लपवण्यासाठी सुरु केलेली दमदाटी संपवण्यासाठी कोण पुढाकार घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.