पुणे : बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राध्यापक असणाऱ्या महिलेने अधिक महिण्याचे वाण दिले नाही, म्हणून सासरच्या मंडळीनी तिला रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती जवळपास ८५ टक्के भाजली. दरम्यान, यवत पोलिसांनी तिच्या पतीला आणि सासूला अटक केली. दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सासरच्या मंडळीनी अधिक महिन्याचे वाण म्हणून सोन्याची अंगठी, सोन्याचे ब्रेसलेटची मागणी केली होती. पूर्ण न झाल्याच्या रागातून प्राध्यापक विवाहितेवर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार वरवंड येथे घडला. तिच्यावर पुण्यात एका खासगी रुगणालयामध्ये उपचार सुरू आहेत.
धनश्री रोहन दिवेकर (२५) असे पीडिताचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती रोहन आणि सासू अरुणा यांना अटक करण्यात आली आहे. रोहन आणि धनश्री यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना चार महिन्याचे अपत्य आहे, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली.
धनश्रीचे वडील हे शेतकरी आहेत, तर ती बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेत संगणक विभागात प्राध्यापिका म्हणून नोकरीस आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळीनी धनश्रीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली होती. त्यात अधिक महिना सुरू असल्याने तिचा पती, तसेच सासू-सासऱ्यांनी सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, तसेच व्याह्यांसाठी पोशाख, अशी मागणी तिच्याकडे केली होती. मानपानावरून शनिवारी रात्री त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास तिला पेटवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.