'शेतकऱ्यांचा कळवळा... ही राजू शेट्टींची नौटंकी'

खासदार राजू शेट्टी यांची निव्वळ नौटंकी सुरु असल्याची घणाघाती टीका, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

Updated: Apr 29, 2017, 12:40 PM IST
'शेतकऱ्यांचा कळवळा... ही राजू शेट्टींची नौटंकी' title=

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांची निव्वळ नौटंकी सुरु असल्याची घणाघाती टीका, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

सत्तेत गेल्यानंतर राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांचा विसर पडला असून, विरोधक आणि राजू शेट्टी दोघेही विदूषक असल्याचं रघुनाथदादा पाटील म्हणाले. राजू शेट्टी हे खासदार आहेत त्यांच्याकडे संसदीय आयुध आहेत... ते सत्तेतही सहभागी आहेत मग ते रस्त्यावर का उतरत आहेत? असा शेट्टींना अडचणीत टाकणारा प्रश्नही रघुनाथ दादांनी विचारलाय. 

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातला वाद आता जगजाहीर झाला असून, या दोघांनी शेतकऱ्यांचं हीत पाहणं सोडलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षांची संघर्षयात्रा आणि सत्ताधाऱ्यांनी संवाद यात्रा दोन्हीही केवळ दिखाव्यासाठी असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये ऊसाला दर जास्त आहे. त्यामुळे राज्यातल्या ऊस उत्पादकालाही सध्याच्या दरापेक्षा 1 हजार रुपये जादा दर मिळावा अशी मागणी करत ही मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या 10 मे रोजी कोल्हापूरमधल्या साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा रघुनाथदादांनी दिला.  कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.