मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष उभारण्यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे 21 ते 24 जानेवारी या कालावधीत रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामुळे शिवकालीन संस्कृतीचा इतिहास उलगडणार असून रायगड जागतिक पर्यटनाच्या नकाशावर पोहचेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रायगड किल्ला केंद्राच्या पुरातत्त्व विभागाकडे असल्याने नजीकच्या काळात रायगडचे जतन करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
एखाद्या किल्ल्यावर महोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या महोत्सवात सुमारे एक हजार कलाकार सहभागी होणार असून स्थानिक रहिवाशांना महोत्सवामुळे रोजगार मिळाला आहे. या महो-त्सवासाठी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवकालीन संस्कृतीचा चैतन्यदायी इतिहास मांडणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध पैलू व स्वराज्याचा रोमहर्षक इतिहास नव्या पिढीसमोर मांडणे, पर्यटकांमध्ये गड, किल्ले या विषयी आवड निर्माण करणे, हा या आयोजनामागचा उद्देश आहे, असे तावडे म्हणाले.
21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊ वाड्यालगत विस्तीर्ण माळरानावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गिते, अर्थमंत्रीसुधीर मुनगंटीवार, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता, आ. भरत गोगावले, विधानपरिषद सदस्य जयंत पाटील, सुनील तटकरे व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
22 ते 24 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे. रायगड किल्ल्यावर सकाळी 9 पासून सायंकाळी 5 पर्यंत महादरवाजा, सभामंडप, राणीवसा, अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधिस्थळ यांची इतिहासकालीन सजावट करण्यात येणार आहे. शाहीर, वासुदेव, भारूडकर आणि गोंधळी शिवस्तुती सादर करणार आहेत. गडाच्या पायथ्याशी पाचाड येथे उभारलेल्या शिवसृष्टीत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत शिवकालीन इतिहास कथन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शिववैभवाचे दर्शन घडवणार्या शिवसृष्टीत शिवराज्याभिषेक सोहळा, शिवकालीन नाणी प्रदर्शन, किल्ल्यांच्या प्रतिकृती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे, इतिहासतज्ज्ञांची व्याख्यानमाला, लोककलांचे दर्शन, ढोल-ताशांची आतषबाजी, शिवकालीन कथा उलगडून दाखवणारे दृकश्राव्य कार्यक्रम, पालखी, कीर्तन, भारूड, गोंधळ, असे सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. शंभूराजे हे नाट्य नितीन बानुगडे-पाटील सादर
करतील. नंदेश उमप शिवसोहळा तर सुभाष नकाशे शिवगर्जना नाट्य सादर करणार आहेत. रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी येणार्या पर्यटकांना दोन्ही ठिकाणी प्रवेश मोफत असल्याचेही
त्यांनी सांगितले.
रायगड महोत्सवाच्या निमित्ताने किल्ल्यावरील पायर्या व रेलिंगची दुरुस्ती, पाचाड येथे पाणी योजना, विजेची पुरेशी व्यवस्था, रस्ता रुंदीकरण सुरू करण्यात आले आहे. भविष्यात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. रायगड किल्ला केंद्राच्या पुरातत्त्व विभागाकडे असून नजीकच्या काळात रायगडचे जतन करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.