औरंगाबाद : काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय बैठकीत काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी नेत्यांना खडे बोल सुनावले. नेत्यांची भाषणं सुरु असताना महिलांना भाषणांची संधी न दिल्यानं रजनी पाटील यांचा पारा चांगलाच चढला.
व्यासपीठावर बोलू न दिल्यामुळे संतापलेल्या रजनी पाटील यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आपला संताप व्यक्त केला. अखेर त्यांना भाषण करण्यास आमंत्रित करण्यात आलं.
व्यासपीठावर बोलण्यास मिळाल्यानंतर ज्या पक्षात महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याची भाषा करतात त्याच पक्षात महिलांना बोलू दया, असं सांगाव लागते, असे मुख्यमंत्र्यांसह, प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार अशोक चव्हाण यांना सुनावलं. इतकंच नाही तर तुम्ही सगळेसुद्धा एका महिलेच्या म्हणजे सोनियाचा आशीर्वाद असल्यानंच इकडे बसले असल्याची आठवणही रजनी पाटील यांनी करुन दिली.
या सगळ्यानंतर मुख्यमंत्री आणि माणिकरावांच्या चेह-यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती. दरम्यान, रजनी पाटील यांचा बोलण्याचा तसा काही हेतू नव्हता, अशी सारवासारव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.