मुंबई : नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. निंभोरकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: निंभोरकर यांची दिल्लीत भेट घेतली.
वर्धा जिल्ह्यातील वडाळा गावातील एका शेतकरी कुटूंबातील तीन मुलांपैकी एक सेना दलात, दुसरा वायू दलात तर तिसरा नौदलात निवडला जाऊन देशाच्या रक्षणासाठी शीर तळहातावर घेऊन लढण्यासाठी सज्ज राहतात, ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.
तीन भावांमध्ये राजेंद्र निंभोरकर हे थोरले बंधू असून त्यांचे मधले बंधू सुधीर निंभोरकर हे सध्या भारतीय वायूसेनेत ग्रुप कॅप्टन या पदावर कार्यरत आहेत. तर तिसरे बंधू विलास निंभोरकर यांनीही भारतीय नौदलात १५ वर्षे सेवा बजावली आहे. सध्या ते मर्चंट नेव्हीमध्ये आहेत.
राजेंद्र निंभोरकर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत निवडल्या गेले आणि आज ते आपल्या कर्तृत्वाने भारतीय लष्करात पंजाब रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट जनरल या हुद्यावर कार्यरत असून ऑपरेशन कमांडचे प्रमुख आहेत. काश्मिरमधील नगरोठा बेसवर नियुक्त असलेल्या निंभोरकर यांना दोन वर्षांपूर्वी अतिविशिष्ट सेवा मेडल देऊन तर कारगिल युद्धात अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दल विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरविण्यात आलंय.
साभार - महान्यूज