मुकुल कुलकर्णी, नाशिक : आदिशक्तीच्या जागराला सुरुवात झालीय. साडे तीन शक्तीपीठा पैकी अर्ध पीठ असणाऱ्या सप्तशृंगी मातेच्या गडासह नाशिकची ग्रामदेवता असणाऱ्या कालिका मातेच्या मंदिरातही घटस्थापनेनं नवरात्र उत्सवाला सुरुवात झालीय. देवीच्या या उत्सवासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन सज्ज झालंय.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या शक्तीपिठाची स्थापना करण्यात येते. देवीच्या या उत्सवाला शारदेय नवरात्रोत्सव म्हणतात. देवीच्या जागरासाठी भक्त परिवार गेल्या वर्षभरापासून वाट बघत होता. देवी मंदिरासह घरोघरी घट स्थापना करण्यात आलीय. नवरात्रात देवीपुढे अखंड दिवा लावला जातो. देवीची उपासना, जप ग्रंथवाचन, भजन, स्त्रोत्र म्हटली जातात. पहिल्या दिवसापासूनच सप्तशृंगीमातेसह सर्वच देवी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय.
सप्तशृंगी गडावर पुढील दहा दिवस खाजगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय. गडाच्या पायथ्याशी नांदुरी गावापासून एसटी महामंडळाच्या बसच्या माध्यमातून वाहतूक केली जाणार आहे.
नवरात्रौत्सवानिमित्त ग्रामीण आणि शहर पोलीस सज्ज झालेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सीमांची नाकाबंदी केली जातेय. नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली जातेय.
दुर्जनांचा नाश करणारी भक्तांचे दु:ख कष्ट दूर करणाऱ्या देवीच्या जागराला सुरुवात झालीय. देवीच्या भक्तांनी केवळ नऊ दिवस देवीची आराधना न करता ३६५ दिवस नारी शक्तीचा सन्मान करावा, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.