शेट्टींची भाजपशी कट्टी... सेनेशी जवळीक?

सत्तेतील भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये सध्या दुरावा वाढत असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात पहायला मिळतंय. भाजपाचा घटक पक्ष म्हणजे खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना... मात्र, आता हीच संघटना भाजपपासून दूर चाललीय... इतकंच नव्हे तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणं शिवसेनेशी जवळीक करायला सुरवात केलीय.   

Updated: May 20, 2017, 08:54 PM IST
शेट्टींची भाजपशी कट्टी... सेनेशी जवळीक? title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : सत्तेतील भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये सध्या दुरावा वाढत असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात पहायला मिळतंय. भाजपाचा घटक पक्ष म्हणजे खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना... मात्र, आता हीच संघटना भाजपपासून दूर चाललीय... इतकंच नव्हे तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणं शिवसेनेशी जवळीक करायला सुरवात केलीय.   

सध्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी केंद्र आणि राज्य सरकारच्या फसवणुकीचा पाढा वाचताना दिसत आहेत. भाजपानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि शेतकऱ्यांना दिलेलं अश्वासन पाळलेलं नाही. त्यामुळं आता न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा देऊन त्यांनी सरकार विरोधात आंदोलनाची घोषणा केली. मात्र, राजू शेट्टी इतकी टोकाची भूमिका घेण्यामागं अनेक राजकीय संदर्भ कारणीभूत आहेत. भाजपानं सत्तेवर आल्यानंतर खासदार राजू शेट्टींच्या सांगण्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद देऊ केलं. मात्र, त्यानंतर राजू शेट्टी यांचा सरकारशी दुरावा वाढला तर दुसरीकडं सदाभाऊ खोत यांची भाजपाशी जवळीक अधिक वाढली. हीच गोष्ट खासदार राजु शेट्टी यांना खटकली. आणि त्यानंतर त्यांनी सत्तेत राहून भाजपाला अडचणीत आणण्याची व्युहरचना आखायला सुरुवात केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर त्यांनी राजकीय गरज ओळखत शिवसेनाला जवळ केलं... इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन भाजप सरकारला खुलं आव्हान दिलं. 

भाजपनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जाणीवपूर्वक शिवसेनेशी जवळीक वाढवलीय. मंत्री झाल्यानंतर सदाभाऊ खोतांचे बदललेले तेवर राजू शेट्टी यांना आणि कार्यकर्त्यांना पटलेले नहीत. त्यामुळं राजू शेट्टींना सदाभाऊ खोतांनाही धडा शिकवायचा होता. राजकीय अपरिहार्तता म्हणून खसदार राजू शेट्टींनी शिवसेनेशी मिळतजुळतं घेतल्याचं दिसून येतंय.

भाजपाचे राज्यातील दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हयात दोन खासदार आणि सात आमदार भाजपचे झाले पाहिजेत. त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा सल्ला दिला होता. तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपासोबत होती. पण बदललेले राजकीय संदर्भ पाहाता राजू शेट्टी हे शिवसेनेची मदत घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण राजकारणात जर-तर ला अर्थ नसल्यामुळं राजू शेट्टी यांची यापुढची वाटचाल कशी असेल यावरच राजकीय चित्र काय असेल हे ठरेल.