मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधकांनी प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Updated: Dec 15, 2016, 09:59 PM IST
मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक title=

नागपूर : निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केल्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधकांनी लावून धरली. विरोधकांनी प्रश्‍नोत्तराच्या तासावर बहिष्कार घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

महादेव जानकर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील नगरपालिका निवडणूक अधिकाऱ्याला फोन करून कॉंग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करावा म्हणून दबाव टाकला होता. याप्रकरणी कॉंग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने देसाईगंज वॉर्ड क्रमांक ९ ब मधील निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. तसेच जानकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच विधानसभा नियम ५७ अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत चर्चेचा आग्रह धरला. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनीही जानकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी केली.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जानकरविरोधी मोहिमेची सूत्रे स्वतःकडे घेत सरकारला नैतिकतेचे फटकारे हाणले.  

दरम्यान, जानकर यांच्यावर जामीनपात्र गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी होईल. या चौकशीत जानकर दोषी आढळले तर कारवाई होईल, अन्यथा होणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि जानकरांना अप्रत्यक्षरीत्या पाठीशी घातले.